Monday, March 6, 2017

नाशिक महापालिकेच्या सत्तेची चावी महिलांच्या हाती

- नगरी सातारकर (ऍड. उमेश अनपट)

नाशिक : नाशिक महानगर पालिकेवर यंदा महीलांचेच निर्विवाद वर्चस्व राहणार हि बाब गुरुवारच्या महानगर पालिकेच्या निकालानंतर स्पष्ट झाली आहे. पुरुष उमेदवारांना मागे टाकत महिलांनी आपले स्थान भक्कम केले आहे. याशिवाय महापौरपदही अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असल्याने महापालिका सभागृहातील सर्वोच्च स्थानी देखील महिलाच विराजमान असणार आहे. सत्तेची चावी महिलांच्या हाती आल्याने शहरातील महिलांचे अनेक प्रश्न प्रभावीपणे मार्गी लागतील असा विश्वास महिलांमधून व्यक्त होत आहे.
महापालिकेसाठी निवडून आलेल्या १२२ उमेदवारांपैकी तब्बल निम्म्याहून अधिक ६२ जागांवर महिलांनी बाजी मारली आहे. ६० जागांवर पुरुष उमेदवार निवडून आले आहेत. हि आकडेवारी पाहता महिलांनी पुरुषांना मागे टाकल्याचे समोर येते. पुरुषांच्या तुलनेत महिलांची सभागृहातील संख्याबळ जास्त असल्याने सत्तेची चावी महिलांच्याच हाती राहणार असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. या आशादायी परिस्थीतीमुळे शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित विषय निकाली निघतील. महिलांची सुरक्षा, शिक्षण, रोजगार, गृहउद्योग यांना चालना मिळेल. याशिवाय महिलांच्या दृष्टीने अतिशय कळीचा ठरणारा शहरातील अपुऱ्या शौचालयांचा मुद्दा मार्गी एक मताने मार्गी लागू यामुळे रोजच होणारी महिलांची कुचंबणा थांबेल, असे वाटते.

------------

भाजप मध्येही "तिचा'च बोलबाला
जमेची बाजू म्हणजे सत्तेसाठीची मॅजिक फिगर गाठून बहुमत पटकावणाऱ्या भारतीय जनता पक्षातही निवडून आलेल्या ६६ पैकी तब्बल निम्म्याहून अधिक ३४ जागांवर महिला उमेदवाराचं निवडून आल्या आहेत. या ठिकाणीही महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. ३२ पुरुष उमेदवार आहेत.

-----------------
महापौरपद देखील महिलेकडेच
येथील महापौर पदही प्रथमच अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या निवडणुकीत आठ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होत्या. त्यापैकी महिलांसाठी राखीव पाच जागांपैकी प्रघाग १ मधून रंजना माणसे, प्रभाग ४ मधून सरिता सोनवणे व प्रभाग १३ मधून रुपाली निकुळे या तीन भाजपच्या महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याकारणाने या तिघींपैकीच एका महिलेची महापौरपदी वर्णी लागणार आहे. तथापि, तब्बल चौथ्यांदा भाजपकडून निवडून येणाऱ्या रंजना भानसी याच प्रबळ दावेदार असून त्यांचीच नाशिकच्या  अकराव्या महापौर म्हणून वर्णी लागणार, असे दिसतेय.

----------------------------

पक्षीय बलाबल
भाजप : ३४
शिवसेना : १८
राष्ट्रवादी : ३
काँग्रेस : २
मनसे : २
अपक्ष : १
______
एकूण ६२

No comments:

Post a Comment